मुंबईतील सीसीआय, एमआयजी क्लब, जुहू जिमखान्यासह ५ नामांकित क्लबवर एफडीएची कारवाई; परवाने निलंबित

मुंबई: राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील पाच नामांकित क्लब व रेस्टॉरंटच्या एफएसएसएआय परवान्यांचे तात्काळ निलंबन केले आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
एफडीएने २७ जुलै रोजी मुंबईतील सीसीआय (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया), एमआयजी क्लब, जुहू जिमखाना यांसह सात बड्या क्लब व रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी केली. यामध्ये फोर्ट परिसरातील जुन्या आणि प्रसिद्ध पूर्णिमा रेस्टॉरंटचाही समावेश होता.


तपासणीत काय आढळले?


तपासणीदरम्यान कच्च्या भाज्यांवर बुरशी, रेफ्रिजरेशन युनिटमध्ये कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र साठवणे, झुरळे व माश्यांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ नाले, गंजलेल्या भिंती, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदींचा अभाव आणि अन्न हाताळताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष काढत एफडीएने संबंधित आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित केले.


राज्यभरातील एकूण कारवाई


चार दिवसांच्या या मोहिमेदरम्यान एफडीएने राज्यभरात ८१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे व इतर आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये ११ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर १२ जणांना सुधारणा नोटीस देण्यात आली. १६ आस्थापनांमधून सुमारे ५८.०३ लाख रुपयांचा, म्हणजेच २१ हजार ४३४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला.


नागरिकांसाठी महत्त्वाचे


एफडीएच्या या मोहिमेमुळे हॉटेल व रेस्टॉरंट्समधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बाहेर जेवताना आस्थापनेचा एफएसएसएआय परवाना वैध आहे का, हे तपासून पाहणे नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते.

Leave a Comment