Ghibli Studio | सोशल मीडियावर सध्या AI द्वारे तयार होणाऱ्या घिबली शैलीतील अॅनिमेशन फोटोचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. अनेक यूझर्स आपल्या वैयक्तिक फोटोचा वापर करून त्यांना कार्टून लूकमध्ये रूपांतरित करत आहेत. मात्र या ट्रेंडमागे सायबर धोकेही लपलेले असल्याचा इशारा गोवा पोलिसांनी दिला आहे.
घिबली स्टाईलमध्ये (Ghibli Studio) बदललेले AI फोटो पाहून अनेक युजर्स त्यांच्या वैयक्तिक प्रतिमा अशा अॅप्सवर अपलोड करत आहेत. गोवा पोलिसांनी (Goa Police) ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, सर्व एआय अॅप्स युजर्सच्या गोपनीयतेचं संरक्षण करत नाहीत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी AI प्लॅटफॉर्मवर आपले वैयक्तिक फोटो शेअर करण्यापूर्वी योग्य विचार करणं गरजेचं आहे.
एआय बेस्ड इमेज जनरेशन अॅप्समध्ये फोटो आणि इतर वैयक्तिक माहिती साठवण्याचा वापर केला जातो. हे अॅप्स कधीकधी ही माहिती युजर्सच्या परवानगीशिवाय थर्ड पार्टीकडे पाठवतात किंवा डीपफेकसारख्या तंत्रज्ञानासाठी वापरतात. त्यामुळे याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळे गोवा पोलिसांनी युजर्सना फक्त नामवंत आणि विश्वसनीय एआय अॅप्स वापरण्याचा सल्ला दिला आहे.
जिबली ट्रेंड मागे मजा आणि धोका दोन्ही
जपानी अॅनिमेशन दिग्गज हयाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) यांच्यामुळे लोकप्रिय झालेल्या ‘जिबली’ (Ghibili Studio) शैलीने आता सोशल मीडियावर ट्रेंड पकडला आहे. या शैलीत एआय वापरून तयार केलेले पोर्ट्रेट्स लोक मोठ्या संख्येने शेअर करत आहेत. ओपनएआय (OpenAI) ने अलीकडेच चॅटजीपीटीच्या सहाय्याने अशा AI इमेज जनरेटरची सुविधा दिल्यामुळे या ट्रेंडला वेग आला आहे. यामुळे फोटो व्हिडिओमध्ये बदलणंही आता शक्य झालं असून, हे व्हिडिओ विनामूल्य तयार करता येतात.
मात्र, अशा AI टूल्सचा वापर करताना कोणत्याही अॅपकडून आपल्या डेटावर कोणत्या प्रकारचा प्रवेश घेतला जातो हे पाहणं आवश्यक आहे. अज्ञात अॅप्सकडून मिळणाऱ्या विनामूल्य सेवा अनेकदा युजर्ससाठी धोकादायक ठरतात. गोपनीयतेच्या उल्लंघनासह सायबर फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात. म्हणूनच, कोणतंही अॅप वापरण्यापूर्वी त्याच्या प्रायव्हसी पॉलिसीचा अभ्यास करणे आणि फक्त अधिकृत व सुरक्षित प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवणे गरजेचे आहे.